गर्भावस्था या विषयावर लिहिलेल्या दोन्ही भागांना दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
गर्भावस्था या विषयावर लिहिलेल्या दोन्ही भागांना दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
©️डॉ. गौरी कैवल्य गायकवाड.
Ob-Gyn
बार्शी.
#नवरात्र
#माळ_सातवी
💛💚🖤🧡🤍❤️💙
#स्तन्यपान
#पोस्टपार्टम_डिप्रेशन
नमस्कार.
गर्भावस्था या विषयावर लिहिलेल्या दोन्ही भागांना दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. त्यामध्ये सुद्धा दुसऱ्या भागावर खूप विशेष प्रतिक्रिया आल्या त्या वाचून माझ्या या लेखमालेचे उद्दिष्ट सफल होत आहे असे मला वाटले. आजच्या भागामध्ये आपण स्तन्यपान करणार्या मातांची काळजी त्यांनी स्वतः आणि परिवाराने कोणत्या प्रकारे घ्यावी हे पाहणार आहोत. या विषयाची व्याप्ती देखील खूप मोठी असल्यामुळे मी केवळ दोनच विषय निवडले आहेत.
A) स्तन्यपान (ज्याविषयी अनेक गैरसमज आहेत.) आणि
B) postpartum depression (पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजेच प्रसूतीनंतर येणारे नैराश्य जे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित आहे.)
A) स्तन्यपान:(स्तनपान हा अपभ्रंश आहे.)
१) प्रसूतीनंतर करण्याच्या इतर सर्व गोष्टी प्रमाणेच स्तन्यपान देखील अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक केले पाहिजे. ग्रंथांमध्ये आईच्या दुधाला म्हणजेच ज्याला स्तन्य असे म्हणतात त्याला “अमृत” म्हटलेले आहे. गर्भ उदरात वाढत असतानाच आईच्या स्तनांमध्ये देखील दूध तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. नऊ महिन्यांच्या काळात आईने घेतलेला आहार आणि इतर काही शारीरिक व मानसिक बदल प्रसूती नंतर हे दूध कसे असेल हे ठरवतात. . शक्यतो बाळाच्या वाढीच्या साठी पहिले सहा महिने आवश्यक असणारे सर्व घटक या दुधामध्ये असतात.
२) पहिले दुध किंवा ज्याला “colostrum” देखील म्हणतात, याविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसमज आढळून येतात. कित्येक ठिकाणी हे दूध घट्ट आणि थोडेसे कमी येते म्हणून फेकून दिले जाते, परंतु या दुधामध्ये बाळाला आवश्यक असणारी जीवनसत्वं, प्रथिने, खनिजं आणि सोबतच रोगप्रतिकारक शक्ति साठी antibodies देखील असतात. हे दूध थोडेसे चिकट आणि पिवळसर रंगाचे असते. तसेच पहिल्या एक-दोन दिवसांमध्ये बाळाला देखील दुधाची गरज थोड्या कमी प्रमाणात असते. त्यामुळे हे दूध बाळाला व्यवस्थित पुरते. म्हणून हे दूध अजिबात फेकून देऊ नये.
२) स्तन्यपान करण्याविषयी दुसरा मोठा गैरसमज म्हणजे आईच्या दुधापेक्षा वरचे दूध म्हणजेच गाईचे किंवा इतर प्राण्यांचे दूध किंवा फॉर्मुला फीड” जास्त चांगल्या प्रतीचे असते असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो, त्यामुळे गरज नसताना देखील बाळाला आईचे दूध थोडेसेच देऊन हे इतर पदार्थ दिले जातात. वास्तविक पाहता पहिले सहा महिने आईच्या दुधा मध्ये बाळाच्या वाढीसाठी लागणारे सर्व काही घटक अतिशय योग्य रित्या तयार झालेले असतात. ज्या शरीरात बाळ तयार झाले आहे, त्या बाळाच्या वाढीसाठी कोणते घटक किती प्रमाणात आवश्यक आहेत हे त्या शरीरापेक्षा जास्त चांगले कुणाला ठाऊक असणार? एवढेच नव्हे तर स्तन्यपानाचा उद्देश केवळ बाळाची शारीरिक वाढ हा नसून बाळाचा बौद्धिक आणि भावनिक विकास देखील स्तन्यपानाने साधला जातो.
३) बाळ जेव्हा स्तनातून दूध पिते तेव्हा आईच्या मनामध्ये खूप सुंदर आणि पूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावना उचंबळून येतात. या भावनांमुळे मेंदूमधील ग्रंथी उत्तेजीत होऊन काही विशिष्ट संप्रेरके (Hormone)तयार होतात. ही संप्रेरके स्तनांमध्ये तयार होणाऱ्या दुधाचे प्रमाण आणि क्वालिटी वाढवतात. तसेच या काळात बाळ देखील आई कडे बघून नवीन स्पर्श, नवीन भावना अनुभवत असते. आईकडून दूध मिळत असल्यामुळे तेदेखील अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने लक्षपूर्वक आईचा चेहरा बघण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत असते. त्यामुळे त्याच्या मेंदूची देखील वाढ आणि विकास होत असतो. आईची ओळख पटत असते, आई सोबत गर्भावस्थेत असल्यापासून निर्माण झालेले भावनिक संबंध वास्तवात येऊन दृढ होत असतात. आई विषयी अत्यंत विश्वासाची भावना निर्माण होत असते. जर स्तन्यपान करताना आईने संपूर्ण लक्ष बाळावर केंद्रित केले, तर बाळामध्ये होणारे हे बदल सुद्धा आईच्या लक्षात येऊ लागतात आणि आईदेखील मानसिक दृष्ट्या आनंदी आणि समाधानी राहते. त्यामुळे स्तन्यपान करताना शक्यतो आई आणि बाळ एवढेच एका ठिकाणी असावे.इतर लोक तिथे असू नयेत. ती जागा शांत, मंद प्रकाशाची आणि आईसाठी आरामदायक असावी. स्तन्यपान सुरू करण्यापूर्वी आईने आधी स्वतः अशाप्रकारे व्यवस्थित स्थितीमध्ये बसावे की जेणेकरून स्तन्यपान करताना हात, पाय, मान, कंबर किंवा मांडी अवघडणार नाही. मांडीवर ऊशी ठेवून त्यावर बाळाला ठेवावे. स्वतः बाळाच्या अंगावर वाकून स्तन्यपान करू नये तसेच दूध पाजताना बाळाच्या डोक्याचा भाग बाकी शरीरा पेक्षा उंच असावा. आईची पाठ आणि कंबर यांनादेखील उशी च्या सहाय्याने योग्य आधार द्यावा. बाळाचे नाक किंवा तोंड दाबले जात नाही ना याची काळजी घ्यावी. तसेच आईने घातलेल्या कपड्याचे चैन , वेल क्रो किंवा कापड या मुळे बाळाच्या चेहऱ्यावर व्रण पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. बाळाचा चेहरा देखील कापडाने झाकण्याची गरज नाही.
४) स्तन्यपान किती वेळ करावे याविषयी देखील आणि मतप्रवाह आहे साधारणपणे एकावेळी 15 ते 20 मिनिटे केलेले स्तन्यपान पुरेसे असते पोट भरल्यानंतर बाळ आपोआप दूध पिणे बंद करते त्यामुळे बाळाच्या भुकेचा अंदाज येणे सोपे जाते. परंतु बाळाचे वय, बाळाची भूक, बाळाचे आजार तयार होणाऱ्या दुधाचे प्रमाण या गोष्टी मुळे या वेळेत बदल होऊ शकतो.तसेच एका वेळेस एकाच स्तना मधुन पूर्ण दूध पाजून पुढच्या वेळी दुसऱ्या स्तनातून पाजावे, की दोन्ही बाजूने थोडे थोडे पाजावे याविषयी देखील वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु breast engorgement टाळण्यासाठी एकावेळी पाजतानाच दोन्ही बाजूंनी थोडे थोडे स्तन्यपान करणे श्रेयस्कर आहे.जर एका वेळी एकाच बाजूने पाजणार असाल तर पुढच्या वेळी आठवणीने दुसऱ्या बाजूने पाजावे.
५) कित्येक आया दवाखान्यामध्ये आल्यावर हा प्रश्न विचारतात की “मला समजत नाही बाळाला माझे दूध पुरत आहे का.. कारण दहा मिनिटाच्या वर ते जास्त दूध पीत नाही!”. अशा वेळी हे लक्षात ठेवावे की बाळाचे वजन दर महिन्याला 600 ग्रॅम ते एक किलो वाढत असेल आणि त्याला व्यवस्थित झोप लागत असेल, दिलेल्या दुधाचे पूर्ण पचन होत असेल आणि लघवी संडास योग्य प्रमाणात होत असेल तर बाळाला दूध व्यवस्थित पुरत आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना तान्ह्या बाळाला सोडून कामावर जावे लागते. अशावेळी बाळाला फॉर्मुला फीड देण्याऐवजी बाळासाठी दूध काढून ठेवणे योग्य आहे. यासाठी ब्रेस्ट पंप चा वापर करण्यात येतो. परंतु व्यवस्थित प्रात्यक्षिक पाहूनच किंवा डॉक्टरांकडून समजावून घेऊन मगच उपयोग सुरू करावा. या ऐवजी हाताने देखील दूध काढून ठेवू शकता. हे दूध स्वच्छ स्टीलच्या डब्यामध्ये घट्ट बंद करून ठेवावे.यामध्ये देखील शक्यतो दोन्ही बाजूचे दूध वेगवेगळ्या डब्ब्यांमध्ये काढून ठेवावे. एकत्र करू नये. ते दूध रूम टेंपरेचरला सहा तासापर्यंत तर फ्रिजमध्ये चोवीस तासापर्यंत चांगले राहते. फ्रिजमध्ये ठेवलेले दूध वापरायचे असेल तर दुधाचे भांडे गरम पाण्यात ठेवून मग दुधाचे तापमान नॉर्मल वर येऊ द्यावे आणि मगच ते बाळाला पाजावे. दूध डायरेक्ट गरम करू नये. कधीकधी आईच्या काही आजारांमुळे आईच्या दुधाला पर्याय शोधावा लागतो अशावेळी गाईचे दूध किंवा म्हशीचे शेळीचे दूध वापरले जाते. हा वापर देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा आणि दूध,तसेच दुधाचे भांडे आणि पाजणाऱ्या व्यक्तीचे हात अत्यंत स्वच्छ असतील याची काळजी घ्यावी. फॉर्मुला मिल्क जर वापरत असाल तर त्याची देखील व्यवस्थित माहिती घेणे आणि स्वच्छता पाळणे महत्त्वाचे आहे.
६) स्तन्यपानाचे बाळासाठी असलेले फायदे आपण पाहिले, परंतु आईला मिळणारे फायदे त्यापेक्षा खूप जास्त आणि निसर्गाप्रती आपला आदर वाढवणारे आहेत. स्तन्यपान करणाऱ्या आईला स्तन्यपान व्यवस्थित चालू असेपर्यंत शक्यतो पाळी येत नाही, त्यामुळे त्या काळात तिला गर्भधारणा राहण्याची शक्यता कमी असते. “नैसर्गिक संतती प्रतिबंध” स्तन्यपानामुळे घातला जातो. तसेच गर्भाशयाच्या पिशवीचा वाढलेला आकार पुन्हा पूर्ववत होण्यासाठी मदत होते. गर्भावस्थेत वाढलेले वजन देखील कमी होण्यास स्तन्यपान फायदेशीर ठरते, याशिवाय भविष्यात होऊ शकणाऱ्या स्तनांच्या आणि काही प्रमाणात गर्भाशयाच्या कर्करोगा ची शक्यता देखील कमी होते आणि स्तन्यपान करताना निर्माण होणाऱ्या हॉर्मोन्स मुळे आईची मानसिक स्थिती उत्तम राहते.
🔴B) *पोस्टपार्टम डिप्रेशन* .
१) डिलिव्हरी नंतर सगळ्यात जास्त दुर्लक्षिली गेलेली गोष्ट म्हणजे “पोस्टपार्टम डिप्रेशन”. हा असा काही प्रकार असतो हेच मुळात 99% लोकांना माहिती नाही. आणि ज्या आया या डिप्रेशन मध्ये असतात त्यापैकी 80 टक्के आयांना आपल्यासोबत नेमकी काय होत आहे हे समजत सुद्धा नाही. परंतु ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे. परदेशामध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये याचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालले आहे आणि एका सर्वेक्षणांप्रमाणे ज्या नवीन माता वेगवेगळ्या कारणाने मृत्यू पावल्या त्यामधील प्रमुख कारण *”पोस्टपार्टम डिप्रेशन मुळे केल्या गेलेल्या आत्महत्या”* हे होते. आणि अमेरिकेत जे होते, ते पुढच्या दहा वर्षांमध्ये अंधानुकरणामुळे आपल्याकडे होतेच होते म्हणून आपण याबाबतीत अत्यंत जागरूक राहणे गरजेचे आहे.
२) हे depression कोणत्याही स्त्रीला डिलिव्हरी नंतर येऊ शकते.delivery झाल्या झाल्या किंवा डिलिव्हरी नंतर एक वर्षाने सुद्धा हे डिप्रेशन येणे सुरू होऊ शकते. पण शक्यतो डिलिव्हरी नंतर च्या तीन ते सहा महिन्यांच्या काळात त्याचे प्रमाण खूप जास्त आढळते. प्रसूती दरम्यान आणि प्रसूतीनंतरचे शरीर यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत असते. हे बदल घडवून आणताना शरीरातील हार्मोन्सच्या लेव्हल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदलतात. या कारणामुळे कित्येक वेळा मूड स्विंग्ज म्हणजेच मानसिक किंवा भावनिक बदल वारंवार होऊ लागतात. तसेच बाळ माते वर अवलंबून असल्यामुळे पुरेशी झोप न मिळणे, स्वतःसाठी पूर्वीप्रमाणे मोकळा वेळ न देता येणे, शरीरामध्ये प्रसूती मुळे झालेल्या बदलांमुळे शरीराचा आकार, त्वचा, केस गळती, वजन या सर्वांविषयी तक्रारी वाढणे, पूर्वीप्रमाणे वाटेल तेव्हा बाहेर जाऊन एन्जॉय करण्यावर किंवा सामाजिक आयुष्य जगण्यावर बंधने येणे. तसेच करियर मागे पडत चालले आहे हा विचार वारंवार डोक्यात येणे, घरांमधून पतीचा तसेच इतर सदस्यांचा बाळाला सांभाळण्यासाठी अपेक्षित आधार न मिळणे, मी चांगली आई होऊ शकेल का?, मी माझ्या बाळाची योग्य काळजी घेते का? असे स्वतः विषयी अनेक प्रश्न वारंवार मनात उभे राहणे ही सर्व कारणे, आणि यापेक्षाही अजून अनपेक्षित कारणे स्त्रीला पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये नेतात.
३)पोस्टपार्टम डिप्रेशन येण्याचे प्रमाण खालील परिस्थितीमध्ये वाढते.
जर स्त्री अतिशय कमी वयात किंवा खूप उतारवयात माता झाली असेल, प्रेग्नेंसी ठेवण्याची इच्छा नसून देखील कुटुंबाच्या आग्रहाखातर कंटिन्यू ठेवावी लागली असेल, प्रेग्नेंसी काळामध्ये नऊ महिने खूप जास्त त्रास झाला असेल, डिलिव्हरी अचानक किंवा अपेक्षेपेक्षा आधी झाली असेल, डिलिव्हरी किंवा सिझेरियन यांचा अनुभव खूप वाईट आला असेल, पूर्वीच्या डिलिव्हरी मध्ये काही कंपलिकेशन्स झाली असतील, गरोदर असताना खूप जास्त मानसिक तणावाला सामोरे जावे लागले असेल, नुकताच कुटुंबातल्या एखाद्या व्यक्ती चा मृत्यू झाला असेल, कुटुंबामध्ये भावनिक किंवा आर्थिक अस्थिरता असेल, पती सोबतचे संबंध तणावपूर्ण असतील, कुटुंबाकडून बाळाच्या संगोपनात अजिबात हातभार लावला जात नसेल, कुटुंबातील एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल, स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग यांची सवय किंवा व्यसन असेल, गर्भधारणेच्या पूर्वीपासून anxiety, depression, bipolar disorder यासारख्या मानसिक आजारांचे निदान होऊन त्यावर ट्रीटमेंट चालू असेल, बाळामध्ये जन्मानंतर काही व्यंग असतील या सर्व करणामुळे स्त्री प्रचंड नैराश्याच्या गर्तेत लोटली जाते.
४) postpartum डिप्रेशन ची लक्षणे:
आईला कायम दुःखी, एकटे आणि उदास वाटणे; कोणत्याही भावना व्यवस्थित प्रकारे न सांभाळता येणे; विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून वारंवार रडू येणे; कोणत्याही गोष्टीची नको तितकी काळजी करणे, त्यावर नको तितका विचार करणे; खूप जास्त झोप येणे किंवा अजिबातच झोप न येणे; काहीही लक्षात न राहणे; कोणतेही निर्णय घेऊ न शकणे; आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीवर चिडचिड होणे, कित्येकदा बाळाचा सुद्धा राग येणे; डोके दुखणे, कंबर दुखी, पोटात दुखणे, डोळ्यांची जळजळ होणे, बद्धकोष्ठता यासारख्या शारीरिक तक्रारी सुरू होणे; खूप कमी किंवा खूप अति खाणे; आजूबाजूच्या लोकांना टाळणे; बाळा विषयी देखील प्रेम न वाटणे; कित्येकदा स्वतःच्या किंवा बाळाच्या
जीवाला हानी पोहोचवण्याची इच्छा निर्माण होणे यासारखी लक्षणे पोस्टपार्टम डिप्रेशन असलेल्या स्त्रीमध्ये बघायला मिळतात.
५)उपाय: यावरील एकमेव आणि खात्रीचा उपाय म्हणजे counselling.. म्हणजेच समुपदेशन. अशा स्त्रीला व्यक्त होण्याची गरज असते तिचे सर्व बोलणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची गरज असते. तिच्या भावना तिच्या साठी देखील अनाकलनीय आणि कोड्यात टाकणाऱ्या असतात. त्या भावना आणि त्यांच्या मागचे कारण समजून घेण्यासाठी तिला विश्वासात घेऊन शांत करणे महत्त्वाचे आहे. तसेच डिप्रेशन चा काळ तात्पुरता आहे की त्यामागे काही मोठे कारण आहे हे देखील मानसोपचार तज्ञ आणि स्त्री रोग तज्ञ यांच्या सल्ल्याने स्पष्ट करणे आवश्यक आहे. गरज पडल्यास काही रक्ताच्या तपासण्या, किंवा मेंदूच्या तपासण्या (CT SCAN ,MRI,EEG) देखील करून घ्याव्या लागतात.
६)या डिप्रेशन मधून माता कधी बाहेर येईल हे “depression किती जास्त गंभीर आहे” त्यावर अवलंबून असतें तसेच डिप्रेशन चे कारण काय आहे यावर देखील अवलंबून असते. अशा वेळी कधी कधी मानसोपचार तज्ञ,मनोविकार तज्ञ, मेंदू विकार तज्ञ, endocrinologist यांच्याकडून देखील उपचार घ्यावे लागतात. प्रसंगी गोळ्या, औषधे देखील घ्यावे लागू शकतात. अशा वेळी पूर्ण कुटुंबाने एकत्रित येऊन मातेला या परिस्थिती मधून लवकरात लवकर बाहेर काढणे आवश्यक आहे. तिच्या भावना समजून घेऊन घरातील वातावरण आनंदी ठेवले पाहिजे. गोळ्या औषधे घेण्याची वेळ शक्यतो येऊ देऊ नये, कारण त्यामुळे स्तन्यपान करणाऱ्या मातांच्या बालकाला त्रास होऊ शकतो. तसेच आईने देखील या परिस्थिती मधून लवकरात लवकर बाहेर येण्याचे ठरवले पाहिजे. कारण आईच्या मानसिक स्थितीचा परिणाम बालकावर आणि पूर्ण कुटुंबावर होत असतो.
७) पोस्टपार्टम डिप्रेशन टाळावे कसे?
खालील गोष्टींची सहाय्याने आपण postpartum depression खूप सहजपणे टाळू शकतो.
🔺शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक बाबींचा विचार करून प्लॅन केलेली प्रेग्नेंसी.
🔺पती पत्नी मधील घट्ट विश्वासाचे आणि समजूतदार पणाचे नाते.
🔺कुटुंबाशी मोकळा संवाद.
🔺घरातील चांगले वातावरण.
🔺मागील दोन लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे गर्भावस्थे मध्ये घेतलेली शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी काळजी.
🔺कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणे.
🔺Delivery होण्या पूर्वीच बाळाच्या संगोपनासाठी द्यावा लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारी कुटुंबीयांची मदत यावर कुटुंबात मोकळे पणाने चर्चा करणे. (पुष्कळ वेळा मुली गृहीत धरतात की बाळ झाले की सगळे घर सांभाळू लागेल, पण आजकाल बऱ्याच वेळा असे होत नाही. )
🔺बाळाच्या जन्मापूर्वी आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करणे.
🔺गर्भधारणा होण्यापूर्वी गरोदरपण आणि प्रसूती याविषयी शास्त्रीय माहिती घेऊन मनाची तयारी करणे.
🔺याशिवाय गरोदर पणाच्या काळात कोणतीही अनपेक्षित, वाईट गोष्ट घडल्यास आपल्या मानसिक स्थितीवर त्याचा परिणाम न होऊ देणे.
तर मंडळी…
आपल्या घरात कोणी स्तनदा माता असेल, तर आजच वरील गोष्टी लक्षात घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा, आणि त्यांच्याशी मोकळा संवाद साधण्याचा आणि घरातील वातावरण माता आणि बालक दोघांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आजची दुर्गाष्टमी खऱ्या अर्थाने साजरी करा.
आजच्या लेखातील हे दोन्ही मुद्दे आणि त्यांचे महत्त्व आपल्या लक्षात आले असतील अशी आशा करते. याशिवाय या विषयावर सांगण्यासारखे खूप काही आहे. मात्र शब्दमर्यादा पाळून लेख इथेच थांबवते.
धन्यवाद.
©️ डॉ. गौरी कैवल्य गायकवाड
Ob-Gyn
बार्शी.