केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एका संघर्षशील अध्यायाचा अंत – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई |
“शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे साहेबांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारं, विधीमंडळात जोरदार आवाज उठवणारं निर्भिड नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दरारा असलेला ‘मन्याडचा वाघ’ हरपला आहे. मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शांत झाला आहे. देशाचा स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, आणिबाणीविरुद्धचा लढा लढणाऱ्या केशवराव धोंडगे साहेबांचं जीवन संघर्षशील होतं. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन हजारो मोर्चे, सत्याग्रहं, आंदोलनं केली.
त्यांचं एकशेदोन वर्षांचं जीवन दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित होतं. विधीमंडळातीन भाषणांनी महाराष्ट्र दणाणून सोडण्याची त्यांची ताकद होती. त्यांच्यासारख्या नेतृत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणाची, वंचितांच्या हक्काच्या चळवळीची मोठी हानी आहे. केशवराव धोंडगे साहेबांचं जीवन हे राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन, प्रेरणा देत राहील, ” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.