लातूर |
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील बडुरकर यांच्या नातेवाईकांच्या मुलाचा पुण्यात लग्न समारंभ होता. तो आटोपून बडुरकर कुटुंबीय निलंग्याकडे निघाले होते. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ त्यांची कार येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सुसाट वेगात असलेली कार पुलाखालच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. त्यात बडुरकर कुटुंबातील चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. अंश किरण बडुरकर, जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर आणि प्रकाश कांबळे अशी अपघातात मयत
झालेल्यांची नावे आहेत. अपघातात जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघाताची माहिती मिळताच औसा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. याच अपघातात गंभीर जखमी झालेले गोदावरी सचिन बडुरकर, जान्हवी सचिन बडुरकर यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातामुळे औसा-निलंगा महामार्गावरील वाहतुक काही काळासाठी ठप्प झाली होती.