पुणे |
पुण्याच्या माजी महापौर, कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांचे आज दुपारी ३.३० च्या सुमारास निधन झाले, त्यांच्यावर पुण्यातील गलॅक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते.
महाराष्ट्रराज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. पाटील म्हणाले कि कसबा मतदारसंघाच्या भाजपा आमदार मुक्ताताई टिळक यांच्या जाण्यानं अवघा महाराष्ट्र हळहळलाय. कुठल्याही पक्षासाठी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्या अखेरचा शब्द ठरतील. मुक्ताताईंबद्दल काय बोलू? त्या खरोखरच आदर्श होत्या. पक्षानं दिलेली संधी त्यांनी जबाबदारी म्हणून स्वीकारली.

महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी पुण्याच्या विकासात भरीव योगदान दिलं. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत कर्करोगाशी झुंज देत असतानाही त्यांनी स्ट्रेचरवरून प्रवास करून मतदानाचं कर्तव्य पार पाडून पक्षनिष्ठेचा वस्तुपाठच घालून दिला.
माझ्या सहकारी असलेल्या मुक्ताताईंच्या निधनाचं वृत्त अतिशय व्यथित करणारं आहे. त्यांच्या जाण्यानं झालेलं पक्षाचं, आमचं नुकसान कधीही भरून निघणार नाही.
ताई, तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ यावी, हे दुर्दैव. या दु:खातून सावरण्यासाठी टिळक कुटुंबीयांना बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! ॐ शांती
उद्या दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत त्यांच्या पार्थिवाचे अंतदर्शन केसरीवाडा येथील निवास्थानी ठेवण्यात येईल.