मुंबईत शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. कुणाचा दसरा मेळावा सर्रस ठरणार असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा घेत आहेत तर यंदा पहिल्यांदाच आमचीच खरी शिवसेना असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दसरा मेळावा घेत आहेत.

या दाव्यामुळे शिंदे-ठाकरे गटाकडून जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची तयारी सुरू आहे. मात्र या दसरा मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील अशी खोचक टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. यापूर्वी सुद्धा महाजन यांनी शिवसेना संदर्भात अनेक खळबळजनक खुलासे केले होते.
प्रकाश महाजन म्हणाले की, आता पहिल्यांदा कुणाकडे डोकी जास्त आहेत त्यावरून खरी सेना कुणाची हे ठरणार. यंदाच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नाही. एकमेकांचे वस्त्रहरण करणार आहेत. सोनं लुटण्याऐवजी अंगावरच्या चिंध्या गोळा कराव्या लागतील. मेळावे यशस्वी होण्याऐवजी यामागे असणारी जी शक्ती आहे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
शिवतीर्थावरील मेळावा यशस्वी झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा जाणार आहे. यशस्वी झाला तर राहिलेल्या शिवसैनिकांचे मनोध्यैर्य वाढणार आहे त्याचसोबत बीकेसीतील मेळावा यशस्वी झाला नाही तर भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यामुळे मेळावे यशस्वी करण्याची गरज संयोजक, आयोजकांपेक्षा इतरांना जास्त आहे असं त्यांनी म्हटलं.