Latest Marathi News

BREAKING NEWS

या चोरांना आता चांगलाच धडा शिकवू…; मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर घणाघाती टीका

0

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव तसेच पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितले आहे. तसेच, ज्यांनी आधी माझे वडील चोरले अशा चोरांना महाशक्ती प्रतिष्ठा देऊ पाहते आहे. मात्र चोर तो चोरच असतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका होती.

अशातच आज पुन्हा एकदा मातोश्री बाहेर उभे राहून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आज महाशिवरात्रीच्या दिवशीच आपले धनुष्यबाण चोरीला गेले. त्यामुळे या चोरांना आता आपण चांगलाच धडा शिकवू. माझे या चोरांना आव्हान आहे की, त्यांनी जो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू जनता कुणाला निवडणार? असे उद्धव ठाकरे स्पष्टपणे म्हणाले.

दरम्यान, २० जूनला शिवसेनेत सगळ्यात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत बंड करून सरळ गुवाहाटीला निघून गेले. हे नाट्य २९ जून पर्यंत सुरूच होते. त्यामुळे राज्यात चांगलाच पेच निर्माण झाला. अल्पमतात सरकार आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मात्र मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अखेर ३० जूनला शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली.

या सर्व प्रकरणानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा ठोकला. त्यानंतर त्यांच्या हा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे गेला. अनेक सुनावणीनंतर अखेर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय जाहीर केला आणि या निर्णयामुळे ठाकरे गटाला मात्र जोरदार धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी आता कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि आपली लढाई नव्याने सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच, आज मातोश्रीच्या बाहेर जमलेल्या लोकांनीही उद्धव ठाकरेंच्या नावाने घोषणाबाजी करत आम्ही तुमच्यासोबत आहोत असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.