Latest Marathi News

BREAKING NEWS

आम्ही सर्व आमदार साहेबांच्या सोबतच – जयंत पाटील

0

मुंबई |

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या राजकीय बंडानंतर रोज नवनवीन बातम्या येत आहेत. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यापासून राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील काही आमदार नव्याने अजित पवारांना पाठिंबा देताना दिसत आहेत. तशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांना आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याच्या चर्चा सुरू आहेत. असे असताना, आम्ही सारे आमदार शरद पवार यांच्या विचारधारेवर ठाम आहोत, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे.

‘शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत पण त्यांना बडव्यांनी घेरले आहे,’ असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. हे बडवे नेमके कोण याची चर्चाही त्यावेळी रंगली होती आणि त्यानिमित्ताने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशी नावे समोर आली होती. मात्र आता जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार गट कामाला लागला असल्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे सांगितले जात होते, पण जयंत पाटील यांनी या हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नव्हता. या दरम्यान, सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून मी शरद पवार साहेबांच्या सोबतच आहे. शरद पवार यांच्यासोबत असणारे आम्ही सर्व आमदार अद्यापही साहेबांच्या विचारधारेवर ठाम आहोत, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.