Latest Marathi News

BREAKING NEWS

वॉशरुममध्ये फोन वापरतात? आरोग्यासाठी ठरेल घातक

0

आधुनिक जगात मोबाईल फोन ही सुद्धा जणू एक प्राथमिक गरज बनली आहे, असे म्हणावे लागेल. मोबाईल फोनमुळे सर्व जग जवळ आलं आहे. आपण यावर इतके अवलंबून आहोत की, यापासून दूर जाणंही कठीण झालं आहे. कामासाठी असो किंवा मनोरंजनासाठी दिवसेंदिवस मोबाईलचा वापर वाढताना दिसत आहे. आपण कुठेही गेलो तरी, मोबाईलसोबत घेऊन जातो.

जर आपण चुकून फोन विसरलो तर, काहीतरी अपूर्ण आहे असं वाटतं. सकाळी उठल्यापासून आपल्या बरोबर झोपेपर्यंत असलेला मोबाईल जणू आपला एक अविभाज्य घटक बनला आहे. काही लोक तर जेवणाच्या टेबलापासून अगदी वॉशरुमपर्यंतही मोबाईल फोन घेऊन जातात. अनेक लोकांना टॉयलेट सीटवरुन बसून फोन वापरण्याची सवय असते. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. जर तुम्ही वॉशरुममध्ये फोन वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

जर तुम्हालाही वॉशरूममध्ये मोबाईल फोन वापरण्याची सवय असेल तर, ही सवय आताच सोडा. हे तुमच्या आरोग्यासाठी फार हानिकारक आहे. अमेरिकेतील सॅनिटायजिंग कंपनी वायोगार्डने याबाबत एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार, 73 टक्के लोक टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरतात. 11 ते 26 वर्ष वयोगटातील 93 टक्के लोक वॉशरुममध्ये मोबाईल फोन वापरतात.

या संशोधनात सामील झालेल्या 11 ते 26 वर्ष वयोगटातील अनेकांनी सांगितलं की वॉशरुममध्ये जाऊन मोबाईलवर गेम खेळतात किंवा चॅट करतात. वॉशरुममध्ये जाऊन वर्तमानपत्र वाचणे किंवा पुस्तक वाचण्याचीही काही लोकांना सवय असते. पण ही सवयही खूप धोकादायक ठरु शकते. त्यामुळे लवकरात लवकर ही सवय बदलणे गरजेचं आहे. वॉशरुममध्ये फोन वापरताना तो कमोडमध्ये पडण्याचा धोका असतो. पण यासोबतच या मोबाईल फोनमुळे तुम्ही आजारी पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. तज्ज्ञांच्या मते, वॉशरुममध्ये मोबाईल फोन वापरण्याची तुमची सवय तुम्हाला फार महागात पडू शकते. वॉशरुममध्ये मोबाईल वापरल्याने तुम्ही आजारी पडण्याचा धोका असतो.

तसेच तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा लोक टॉयलेट करताना कमोडवर बसतात तेव्हा त्यांच्या कंबर आणि नितंब येथील नसांवर दबाव पडतो. ज्या स्थितीत लोक टॉयलेट सीटवर बसून शौच करतात. त्यावेळी तेथील नसांवर दबाव येतो. त्यामुळे मूळव्याधसारखा आजार होण्याची धोका असतो. बराच वेळ बसून मोबाईल फोन स्वाईप किंवा स्क्रोल केल्याने तुम्हाला कंबर दुखीसारख्या आजारांचा ही सामना करावा लागू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.