Latest Marathi News

BREAKING NEWS

विधानसभा अध्यक्ष अवमान प्रकरणी संजय शिरसाट यांच्याकडून संजय राऊत विरोधात हक्कभंग

0

राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर घ्यावा यासाठी खासदार संजय राऊत आग्रही मागणी करत असून त्याचप्रमाणे निर्णय लवकर घेण्यासाठी अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप करून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केला आहे. यामुळे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून आणखी राजकारण तापण्याची चिन्ह आहेत.

उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे सन्माननीय विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करत आहेत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

पुढे शिरसाठ म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदेमंडळाच्या अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान देता येत नाही, इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात. अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त व्यक्तीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेले आरोप गंभीर आहेत अस यावेळी शिरसाठ म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.