सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात युरिया खताची प्रचंड टंचाई आहे. युरिया उत्पादक कंपन्या सोलापूर जिल्ह्यात युरिया उपलब्ध करून देत नसल्याने तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित खत कंपन्यांचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त युरिया खत सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या खरीप पिकाची खुरपणी अवस्था आली असून या खुरपणी अवस्थेच्या वेळी पिकांसाठी युरिया खताची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे उसाच्या बांधणीसाठी सुद्धा यूरिया आवश्यक आहे, मात्र बाजारात कुठेही उपलब्ध नाही.
रासायनिक खत कंपन्या सुद्धा युरिया सोबत व्यापाऱ्यांना इतर खते लिंकिंग करून देत असल्यामुळे व्यापाऱ्यांची कोंडी होत आहे. कंपन्यांनी विक्रेत्यांना लिंक केल्यामुळे विक्रेते सुद्धा शेतकऱ्यांना युरिया खतासोबत इतर खते लिंक करत असल्याचे दिसून येत आहे. इफको जय किसान, कृभको नर्मदा उज्वला,आयपीएल उत्पादक कंपन्या सोलापूर जिल्ह्यात युरियाचा पुरवठा करतात. या सर्व कंपन्यांनी मिळून या महिन्यात एक लाख मेट्रिक टन युरिया सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून द्यावा. पुणे कृषी आयुक्त कार्यालयाने सुद्धा युरियाचा कोटा सोलापूर जिल्ह्यासाठी देऊन सुद्धा कंपन्या सोलापूर जिल्ह्यात पुरवठा करीत नाहीत.
शासन दरबारी सोलापूर जिल्हा रब्बी जिल्हा म्हणून नोंद आहे यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खताचा पुरवठा सोलापूर जिल्ह्याला होत नाही प्रत्यक्षात मात्र बदलत्या हवामानानुसार सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बीची वाट न पाहता खरिपात मोठ्या प्रमाणावर पिके घेत आहेत. याची दखल प्रशासनाने घेऊन जास्तीत जास्त युरिया खत सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महेश चिवटे यांनी केली आहे.
याबाबत बोलताना मांगी येथील प्रगत शेतकरी ‘सुजित बागल’ म्हणाले की सध्या युरिया खताची शेतकऱ्यांना गरज आहे मात्र बाजारात उपलब्ध नाही उपलब्ध असलेला युरिया खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना इतर खते खरेदी करावी लागत आहे. यावरओम ऍग्रो एजन्सी चे मालक लखन काळे म्हणाले की युरिया खताची गाडी घेण्यासाठी आम्हाला त्याच्याबरोबर विद्राव्य खते डीएपी पोटॅश अशी खते घ्यावी लागतात. शेतकरी नुसता युरिया मागतात यात दुकानदाराची कोंडी होते.
याबाबत कृषी अधिकारी शंकर मिरगणे म्हणाले, तालुक्यासाठी अतिरिक्त युरियाचा पुरवठा व्हावा यासाठी कंपन्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा बाजारात उपलब्ध असलेला दाणेदार युरिया व नत्रयुक्त उपलब्ध असणारी अमोनियम सल्फेट सारखी खते वापरावीत यावर्षी तूर, मूग, उडीद, मका, या पिकांची खरिपात मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्यामुळे युरियाची मागणी वाढली आहे
दिनेश मडके