मुंबई |
एसएनडीटी विद्यापीठाचे नवीन केंद्र बल्लारपूर जि.चंद्रपूर येथे सुरू करण्याबाबत मुंबई येथे बैठक संपन्न झाली. येत्या शैक्षणिक वर्षांपासून येथे रोजगारभिमुख आणि कौशल्यआधारीत अभ्यासक्रम सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमाचा अत्यंत फायदा होईल व रोजगार निर्मिती होईल असे प्रतिपादनही त्यांनी केले.
चंद्रपूर येथील बल्लारपूर येथे एसएनडीटी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा निधीबाबतचा सविस्तर प्रस्ताव करण्यात यावा. आवश्यक पदभरती होईपर्यंत करार पद्धतीवर नेमणुका करून काम सुरू करण्यात यावे. स्थानिक रहिवाशांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार जी, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या नवीन केंद्रामध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.