ठाणे | छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. राज्यातील सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीची ही पहिली संयुक्त सभा होती. या सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेतेमंडळीची उपस्थिती होती. यावेळी सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर आणि राज्य सरकारवर परखड शब्दात टीका केली.
यासंदर्भात बोलतान शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आणि मविआच्या सभेवर टीकास्त्र सोडत, थेट उद्धव ठाकरे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली. या मागणीमुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद होण्याचे चिन्ह दिसून येत आहे,
हातातील सत्तागेल्यापासून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्हाला शिव्या देण्याचे काम होत आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, राजकीय पातळी घसरल्याचे बघायला मिळत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंच फक्त शिव्याशाप देण्याचे काम केले जात आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही बघायला मिळाली नव्हती, असे श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले.
९ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी घडल्या, त्यामुळे सत्ताबदल झाला. त्यांनी कधी विचारही केला नसेल की अशा काही गोष्टी घडून येतील. त्यामुळेच सगळा थयथयाट सुरू आहे. रोज कुणाला ना कुणालातरी शिव्या दिल्या जात आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकासाचा एकही शब्द त्यांच्याकडून काढला जात नाही. पण जे आज मोठमोठ्या सभा करत आहेत त्यांनी गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हितासाठी नेमके काय केले? हे त्या सभेतून आधी सांगायला पाहिजे होते, असा चिमटाही त्यांनी उद्धव ठाकरेंना काढला.