मुंबई | एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ४० आमदार बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केले मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला होता मागच्या काही महिन्यापासून अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी वर्गाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.
अशातच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे त्यांना जोरदार धक्का मिळाला आहे. पुण्यातील ठाकरे गटातील माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी पक्षाला रामराम केला आहे. राम गावडे हे येत्या बुधवारी ५ एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये राम गावडे हे एकटेच प्रवेश करणार नसून त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राम गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. तर गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे यांच्याकडून पुण्यातील कार्यकर्त्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राम गावडे यांनी सांगितले.
“गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना विकासासाठी काहीच दिले नाही. सतत अवमानाची वागणूक तसेच वारंवार बैठका घेऊनही त्यावर काहीच अंमलाबजावणी झाली नाही. त्यामुळे खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदार संघ या दोन्ही मतदार संघातील कार्यकर्त्यांना घेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत,” असे राम गावडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.