शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदेगटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाले असून त्यांच्यासमोर पक्ष उभा करण्याचे मोठे आव्हान आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर ओपन जीपमधून भेटण्यास आलेल्या शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले होते.
याच पर्सव्हभूमीवर आज शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे राज्यभरातील शहरप्रमुखांसोबत बैठक घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी शहर आणि जिल्हाप्रमुखांना दिली आहे. शिवसेना प्रमुख जेव्हा गेले तशीच परिस्थिती आता आपल्यावर आली आहे. सुपारी देऊन शिवसेनेच्या हत्येचा प्रयत्न झाला.
भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. आता आपल्याला नव्या जोमाने काम करायचे आहे. राज्यभरातील शाखांशी संपर्क साधा. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून गावोगावी लोकांशी संपर्क साधा. मी लवकरच शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहे. जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच इतर नेत्यांनाही त्यांनी महाराष्ट्रात दौरे सुरू करण्याच्या सूचना केल्या.