केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनचं पक्षचिन्हं गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला अखेर मशाल हे चिन्ह मिळाले. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. मशाल हे चिन्ह घेऊन शिवसेना लढण्यासाठी सज्ज आहे. शिवसेनेचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने लिहीला जातोय.
पुढे बोलताना त्या म्हणल्या की, जे कुटील आणि जटील राजकरण भाजपाकडून केलं जातंय, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, या अन्यायाविरोधात आमचा शिवसैनिक मशाल हातात घेऊन गावागावात जाईल. आगामी निवडणुका लढवण्यासाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावच पुरेसं आहे. ठाकरे हे नाव लोकांच्या मनामनात, लोकांच्या हृदयात कोरलेले आहे, असे अंधारे म्हणाल्या.
यानंतर अंधारे यांनी शिंदे गटाला धारेवर धरले. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला पेलणार आहे की नाही, हे येत्या काळात जनता त्यांना दाखवून देईल. . चिन्हं लोकांपर्यंत पोहचवणे हे आव्हान नाही. हायटेक प्रसारमाध्यमात चिन्ह चटकन लोकांपर्यंत पोहचेल. बाळासाहेबांची शिवसेना कोणती आहे, हे जनतेला माहिती असल्याचेही अंधारे म्हणाल्या.
ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. ज्या प्रकारे बाळासाहेबांचं नाव या लोकांकडून चोरण्याचा प्रयत्न झाला. यावरूनच लक्षात येते की, आपल्या नावापुढे मोदी सेना, शहा सेना, फडणवीस सेना असे नाव लावून यांना तो चमत्कार साधता येत नाही, असा टोलाही अंधारे यांनी शिंदे गटाला लगावला.