एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी बंड करत भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले आहेत. खरी शिवसेना आपलीच असा दावा करत एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव पक्षचिन्ह आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे ठाकरे गटातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची गळती सुरु झाली.
सुरूवातीला आमदार-खासदार, त्यानंतर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून नवीन पक्षउभारणी करण्यास सुरूवात केली असून महाराष्ट्रभर दौरा सुरु आहे. शिवसेना सोडून परत गेलेले काही माजी आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाचं टेन्शन वाढणार आहे.
शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शेकडो संर्थकांसह शिवबंधन बांधण्यासाठी वाकचौरे शिर्डीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
तसेच “सुबह का भुला श्याम को घर लौटे तो उसे भुला नहीं कहते ” अशी प्रतिक्रिया त्यांनी शिर्डीतून निघताना दिली आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघात २००९ साली रामदास रामदास आठवले यांचा पराभव करत शिवसेनेकडून खासदार झालेले भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा घरवापसी करत आहेत. मात्र दुसरीकडे स्थानिक उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला आहे.