मागच्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असणाऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्ती अशी नवीन युती आज समोर आली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आणि वंचितच्या वतीने युतीची घोषणा करण्यात आली आहेत. पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी ही घोषणा केली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पुढील वाटचालीसाठी एकत्र आलो आहोत. प्रथम देश हीत महत्वाचं आहे. तर यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीची युती फक्त शिवसेनेच्या ठाकरे गटाशी आहे. महाविकास आघाडीशी ही युती नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
दोन्ही शक्तींना एकत्र येण्याची गरज होती. राज्यात भांडवलशाहीचं राजकारण सुरू आहे. तर महाराष्ट्रात महत्वाचे मुद्दे मागे पडले असल्याचंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जिंकणं राजकारण्याच्या हातात नाही पण उमेदवारी देणं त्यांच्या हातात आहे असं आंबेडकर म्हणाले आहेत.