विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. मात्र काही वेळातच कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“जे काही घडलं ती Spontaneous Reaction होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही” असं म्हटलं आहे. ऋता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकडोंनी ‘विनयभंग’ होत असतील. रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही” असं देखील ऋता यांनी म्हटलं आहे.