ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेऊन 16 आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याविषयी भाष्य करत आहेत. त्यावरच राऊत यांनी अक्षेप घेतला आहे. मी कोणता खटला चालवणार, कसा चालवणार हे कधी कोणता न्यायाधीश सांगतो का? राहुल नार्वेकर का सांगत आहेत? असा सवाल करतानाच अशा पद्धतीने एखाद्या खटल्याची माहिती देणारा हा पहिलाच माणूस मी पाहिला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, नार्वेकरांच्या पक्षांतराविषयी आणि वैचारिक बैठकीविषयी सांगितलंच आहे. पक्षांतर हा त्यांचा छंद आणि व्यवसाय आहे,. हे स्पष्टपणे सांगतो. ते ज्या पक्षात गेले नाहीत असा एकही पक्ष उरला नाही. त्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड असण्याचं कारण दिसत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने मुलाखती दिल्या आहेत. त्या भगतसिंह कोश्यारी यांना शोभत होत्या. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने नियमबाह्य वर्तन करू नये हे संकेत आहेत, असं संजय राऊत यांनी सुनावलं.
पुढे राऊत म्हणाले की, देशातकायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी संविधान निर्माण झालंय. तुम्ही कायद्याचं राज्य मोडीत काढण्यासाठी संविधानाचा वापर करत आहात. तुम्ही ज्या मुलाखती देत आहात त्या कायद्याच्या राज्यात बसत नाहीत. न्यायालयासमोर जो खटला चालवला जातो, तेव्हा न्यायामूर्ती पत्रकार परिषदा घेत नाही.
तसेच न्यायमूर्ती मी काय करणार हे सांगत नाही. मला काय अधिकार आहे हे सांगत नाहीत. मी हा पहिला माणूस पाहिला. पहिले कोश्यारी आणि दुसरे हे. कोणताही न्यायामूर्ती समोर येऊन सांगत नाही माझ्यासमोर हा खटला चालणार आहे. मी हा निकाल देणार आहे. मी हे करणार आहे. हे पहिले गृहस्थ आहेत. त्यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.