Latest Marathi News

BREAKING NEWS

त्रिपुरा, नागालँडमधील विजयानंतर मोदींनीच सांगितलं भाजपच्या विजयाचं कारण

0

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर दिल्लीमधील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना देताना, “पंतप्रधानांनी ईशान्येमधील त्रिपुरामध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठीच्या मोहिमेचं नेतृत्व केलं.

नागालँडमध्ये भाजपाला यशही मोदींनीच मिळवून दिलं. तर मेघालयमध्ये भाजपाच्या मतांच्या टक्केवारी झालेली वाढही मोदींमुळे शक्य झाली. यासाठी मी लाखो कार्यकर्ते आणि या विजयासाठी काम करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो,” असं म्हणाले. “पंतप्रधान मोदींनी 50 हून अधिक वेळा ईशान्य भारताचे दौरे केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपण नागालँडमध्येही यश मिळवत आहोत. त्यांनी पूर्वेकडील राज्यांवर जास्त लक्ष देण्याचं धोरण स्वीकारलं. ईशान्य भारतामधील या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने मी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करतो,” असंही नड्डा म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ईशान्य बारतामधील जनतेचे विशेष आभर मानले. “सर्वात आधी ईशान्य भारतातील सर्व नागरिकांच्या सन्मानार्थ आपआपले मोबाईल काढून फ्लॅश लाइट सुरु करुन अनोख्या पद्धतीनं त्यांचं अभिनंदन करुयात,” असं मोदींनी म्हणता सर्व उपस्थितांनी आपल्या मोबाईलची फ्लॅश लाइट लावून भाजपाच्या विजयासंदर्भातील घोषणाबाजी केली.

“मी नतमस्तक होऊन ईशान्य भारतातील नागरिकांचे आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. तेथील कार्यकर्ते हे आमच्यापेक्षा अधिक मेहनत घेत आहेत, त्यामुळेच मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आजचे निकाल हे देशाबरोबर जगभरातील लोकांसाठी संदेश आहे. भारतामध्ये आजही लोकशाहीवर किती विश्वास आहे आणि लोकशाही किती सक्षम आहे हे दर्शवणारे आजचे निकाल आहेत,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.