महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर ४ अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना ही घटना घडली. तोंडाला रुमाल बांधून हल्लेखोर आले होते. क्रिकेटच्या स्टंम्पने ही मारहाण करण्यात आली. त्यात संदीप देशपांडे यांनी स्वत:चा बचाव केला त्यानंतर हे हल्लेखोर तिथून पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या देशपांडेवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सकाळी वॉकला गेले असताना ४ अज्ञातांनी हल्ला केला. संदीप देशपांडे रोज सकाळी वॉकला जातात हे माहिती होते. त्यानुसार प्लॅनिंग करून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर स्थानिकांनी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आणि हॉस्पिटलला पोलीस अधिकारी पोहचले आहेत. घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येणार असून हा हल्ला कुणी केला याचा पोलीस शोध घेणार आहेत.
या हल्ल्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाची स्थिती आहे. घटनेमुळे मनसेचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा राजकीय हल्ला आहे. संदीप देशपांडे मनसेची भूमिका मांडायचे. इतर पक्षांविरोधात भूमिका घ्यायचे त्यामुळे संदीप देशपांडे यांना गप्प करण्यासाठी हा हल्ला केला गेल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. अद्याप या हल्ल्यामागे कोण आहेत याची माहिती समोर आली नाही. हल्ल्यात संदीप देशपांडे यांना मार लागला आहे. परंतु ते सुखरुप आहेत. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आहे.