पुणे : आज पुणे शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण तथा भूमिपूजन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच, थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना गौरविण्यात आले. आज पंतप्रधान मोदीजींचे पुण्यनगरीत आगमन झाले असता सकाळी त्यांचे पुणे विमानतळावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या समवेत स्वागत केले.
हेही वाचा :जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबारातील पीडितांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची भरपाई जाहीर

सर्व प्रथम मोदी यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर परशुराम महाविद्यालय मैदानावर आयोजित पुरस्कार सोहळ्यात टिळक ट्रस्टचे दीपक टिळक यांच्या हस्ते त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हेही वाचा :लोकमान्य टिळकांचे नातू दीपक टिळक यांनी हा पुरस्कार मोदींना का देण्यात येतोय या कारणांवर प्रकाश टाकला
पोलीस परेड ब्राऊन येथे आयोजित कार्यक्रमात पुण्यातील मेट्रोच्या २ मार्गिकांचे, पिंपरी चिंचवड येथील कचऱ्यापासून वीज बनविणाऱ्या महत्वपूर्ण प्रकल्प समवेत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बांधलेल्या घरांचे लोकार्पण आणि प्रस्तावित घरांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळालेल्या नागरिकांना घराची किल्ली पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देण्यात आली.
पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाठी महत्व पूर्ण अशा योजनांचे लोकार्पण पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते होणे हा ऐतिहासिक शहरासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या समवेत पुणे शहरातील सर्व प्रमुख नेते, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.