कोल्हापूर |
जिल्ह्यात मागील दोन दिवस धरण क्षेत्र तसेच पंचगंगेच्या खोऱ्यात संततधार सुरु होती. मागील 24 तास पंचगंगा नदीची पाणीपातळी काहीशी स्थिर राहिली. मात्र धरणक्षेत्रात रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे कुंभी, कासारी व राधानगरी या धरणांचा मिळून अंदाजे 8 हजार क्युसेक विसर्ग पंचगंगेत येण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत राजाराम बंधारा येथे 40-41 फुटावर असलेली पाणीपातळी पुढील 15 तासात 45 फुटावर जावू शकते. पंचगंगा धोका पातळीवर वाहण्यास सुरुवात झाल्यावर कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये पुराचे पाणी शिरते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरुन न जाता वेळेत पाणी येण्याआधीच स्थलांतर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेद्वारे नागरिकांना केले आहे.
सध्या राजाराम बंधारा येथून 60 हजार 106 क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरीतून येणारा नवीन विसर्ग 7 हजार क्युसेक आहे. कुंभी व कासारी मधून अनुक्रमे 700 व 1 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. असा मिळून 8 हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग पंचगंगा नदीत वाढणार आहे. या काळामध्ये अजून पाऊस पडल्यास पुढे पाणीपातळीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून वेळेत आवश्यक त्या ठिकाणी स्थलांतरण प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिली.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थिती पाहता पूरबाधित क्षेत्रात नागरिकांनी शेतात जावू नये किंवा बाधित क्षेत्रातील कामे करु नयेत. स्थलांतरासाठी आवश्यक तयारी करुन प्रशासनाच्या सुचनेनुसार घर सुरक्षित बंद करुन नागरिकांनी बाहेर पडावे. प्रशासनाकडून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात मिळून संभाव्य 478 निवारागृह तयार करण्यात आली आहेत. नागरिकांना निवारा, अन्न, पाणी, स्वच्छतागृह इत्यादी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच पशुधनासाठी निवारा, चारा याचीही सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत 65 कुंटूंबातील 319 जणांचे स्थलांतरण झाले आहे. 127 जनावरे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. महापालिकेने 15 कुंटुंबातील 51 जणांना स्थलांतरीत केले आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत महानगरपालिकेद्वारे शहरातील इतर सर्व पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. निवारागृहात नागरिकांसाठी इतर सुविधा यात औषधे व अनुषंगिक साहित्यांचा पुरवठा केला जात आहे.