ठाणे | हर हर महादेव चित्रपटावरुन ठाण्यात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडहे ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये गेले. या मॉलमधील चित्रपटगृहात प्रवेश करुन त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यांनी सर्व प्रेक्षकांना थिएटरच्या बाहेर काढल्याची माहिती आहे.
या झालेल्या गोधळानंतर चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली. यावेळी एका प्रेक्षकासोबत आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केल्याची माहिती आहे. आव्हाड शो बंद पाडून मॉलमधून बाहेर पडल्यानंतर तिथे मनसे नेते अविनाथ जाधव कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये दाखल झाले. त्यांनी बंद पाडलेला चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जितेंद्र आव्हाड काही सेन्सॉर बोर्ड नाही.प्रेक्षकांनी घाबरायची गरज नाही. मनसे तुमच्यासोबत आहे. संस्कृतीच्या गोष्टी करणाऱ्यांनी अशाप्रकारे येऊन प्रेक्षकांना मारणं ही कोणती संस्कृती आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करत जाधव यांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले. मागच्यावेळी तुम्ही तुमच्या बंगल्यात घेऊन जाऊन एकाला मारलं होतं तेच आज इथे येऊन केलं. नक्की तुम्ही बदलत नाही आहात. तुम्ही लोकांना गृहीत धरत आहात, अशी टीकाही त्यांनी केली.