ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. राऊत यांनी काल एकेरी उल्लेख करत आव्हान दिल्यानंतर आज नारायण राणे यांनीही त्यांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत हे माझ्याकडे आले आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलले, ते मी उद्धव यांना एकदा भेटून सांगणार आहे. मी ते सांगितल्यानंतर उद्धव आणि रश्मी हे दोघेही राऊतांना चप्पलेने मारतील, अशा शब्दात नारायण राणेंनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस.. झालं आता. मी कालपर्यंत गप्प होतो. यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा करेन.’ अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी राणे यांच्यावर केली होती. तसेच राऊत यांनी त्यांना सुरक्षेविना फिरण्याचे आव्हान दिले होते. यावर राणे म्हणाले की, राऊत यांनी मला सुरक्षेविना फिरण्याचं आव्हान दिलं. कुठे यायचं हे राऊतांनी सांगावं, मी आजच तिथे यायला तयार आहे.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, माझा इतिहास शिवसेना घडवण्यामध्ये आहे, शिवसेना संपवण्यामध्ये नाही. संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली, आज त्यांना शिवसेना संपवण्याचाच आनंद होत आहे. शिवसेनेचे राज्यात ५६ आमदार होते. आता फक्त १२ उरले आहेत आणि ते उरलेले घालवण्यासाठी राऊत युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. राज्याचा विकास व्हावा, रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी मी आणि माझा पक्ष प्रयत्न करत आहे.