राज्यात कोरोनाच्या भीषण संकटानंतर आता गोवर आजाराने थैमान घातले आहे. यावरून सामानाच्या अग्रलेखातून शिंदे सरकार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. संजय राऊत अग्रलेखात म्हणाले की, महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे.
मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत. कधी आसामचे पर्यटन तर कधी दुसरे काही, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत. चीनमध्ये कोरोना लॉक डाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले! अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
कोरोना संकटकाळात राज्यात ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर होते व सतत दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते, मार्गदर्शन करीत होते. आज ते चित्र नाही, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे सरकारवर ताशेरे ओढले.गोवरसंदर्भात मार्गदर्शक नियमावली महाराष्ट्र राज्यासाठी जारी केली गेली. त्या नियमावलीचा अभ्यास सर्वप्रथम राज्याच्या खोकेबाज आरोग्यमंत्र्यांनी करायला हवा. महाराष्ट्राच्या नशिबी या संकटकाळात एक बेजबाबदार व उठवळ आरोग्यमंत्री आला. त्यास परिस्थितीचे गांभीर्य माहीत नाही. त्यामुळे संकटाची तीव्रता जास्त आहे, असे म्हणत तानाजी सावंत यांना राऊतांनी धारेवर धरले.