काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजिनयनानंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते अशातच आता महसूल मंत्री रदकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना टोला लगावला आहे. २०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणार म्हणवून मिरवून घेणारे आता हतबल का झाले ? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी घणाघाती टीका करीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज्यात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर माध्यम प्रतिनिधींनीकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविण्याची भाषा करतात, त्यांचे प्रदेशाध्यक्षांशी जमत नाही म्हणून सांगतात. या बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटते.
नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण काँग्रेसने महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही, हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच ज्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघात मविआचा प्रचार करायचा होता, त्यावेळी तुम्ही आजारी होता. निवडणूक संपल्यानंतर तुम्ही व्हीसीवर भूमिका स्पष्ट करायला लागलात. मग निवडणुकीत देखील व्हीसीवर प्रचार करु शकला असता. सोयीप्रमाणे राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. लोकांनी खरी परिस्थिती माहीत आहे. त्यामुळे विनाकारण लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणे योग्य नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली.