सोलापूर |
राज्याच्या सहकार विभागाने राज्यातील 18 उपनिबंधक सहकारी संस्था ‘वर्ग अ’ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात सोलापूर जिल्हा उपनिबंधकपदी किरण गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी किरण गायकवाड यांनी नाशिक आदिवासी विभागाचे जिल्हा उपनिबंधक म्हणून काम पाहिले आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख आहे. तर सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक पदी बदली करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात परवानाधारक खासगी सावकार ४९६ आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक अक्कलकोट १११, माढ्यात ९६, बार्शीत ८८ आणि अकलूजमध्ये ८७ परवानाधारक सावकार आहेत. गतवर्षी जिल्ह्यात १०८१ परवानाधारक सावकार होते. आता जिल्ह्यात ११६० सावकार आहेत.
परवानाधारक खासगी सावकारांना शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरापेक्षा अधिक व्याजदर आकरता येत नाही. कोणी तसे केल्यास किंवा अवैध सावकारीबाबत पुराव्यानिशी आमच्याकडे तक्रार कराव्यात, असे आवाहन नूतन जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी केले आहे.