शिवसेना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. अशातच कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल दाखवत आहेत. त्यांचा फोन लागत नसल्याने इतर आमदारांप्रमाणे भास्कर जाधवही ‘शिंदे’ सेनेत सहभागी तर नाही झाले ना? अशा चर्चा आता रंगत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही.”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी सेनेच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांचा केमिकल लोच्या झाल्याचे म्हटले होते. आता शालिनी ठाकरे यांनी सेनेच्या परिस्थितीवर बोट ठेवत टोला लगावला आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “महाविकास आघाडीने अडीच वर्षे उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनासारखे राष्ट्रीय संकट असताना आरोग्य खात्याने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला नाही, असे कोणी म्हणत असेल तर ते राजकीय अज्ञान आहे. प्रसिद्धी माध्यमांमधून ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्या नाकारता येणार नाहीत असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.
स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही…#सर्किट #कलानगर #केमिकललोच्या #विधानपरिषदनिवडणूक #एकनाथ_शिंदे #शिवसेना
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 24, 2022