नाशिक: महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. कोणाच्या दुधात पाणी आहे हे जनतेला चांगलं समजतं, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर दिले आहे. खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर दुध आंदोलना दरम्यान विखारी टीका केली होती.
भाजपच्या छत्री खाली आंदोलनचा अभिनय करणाऱ्याने राजू शेट्टी सारख्या प्रामाणिक माणसावर चिखल फेक करून स्वतःची पात्रता सिद्ध केली. आजच्या दूध आंदोलनात शेतकरी न आल्याचं नैराश्य या नेत्याला लपवता आलं नाही. आम्हीही खालच्या भाषेत जाऊन प्रत्युत्तर देऊ शकतो. पण शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्ही राहतो ते संस्कार पायदळी तुडवणार नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे.कोणाच्या दुधात पाणी आहे हे जनतेला चांगलं समजतं, असा टोला जगताप यांनी लगावला आहे.
नेमक काय म्हणाले होते सदाभाऊ खोत
शेट्टी यांची अवस्था गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडले आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही, हे सुचत नाही.या उलट त्यांनीच दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केले आहे. बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले, अशी टीका खोत यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद मिळणार होतं. मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःला मंत्रीपद हवे असल्याने भुयार यांना मंत्री पद मिळू दिले नाही, असा आरोपही खोत यांनी केला आहे.