ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून सातत्याने भाजपवर टीका करण्यात येत आहे. या टीकेचा भाजप नेते आशिष शेलार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तुम्ही तुमचे नाव सुषमा अंधारेंऐवजी सुषमा आगलावे करा, असा खोचक सल्ला शेलार यांनी अंधारेंना दिला. स्वत:च्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, असेदेखील शेलार यांनी म्हटले आहे. शेलार हे काल मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केले.
सुषमा अंधारे यांना मी विनंती करतो, त्यांनी त्यांचे आडनाव बदलून सुषमा आगलावे करावे. याशिवाय त्यांनी मनिषाताई यांच्याकडे पाहावे आणि त्यांची काय स्थिती झाली, हे समजून घ्यावे, असा टोलाही शेलार यांनी लगावला. तसेच, सुषमा अंधारे मी तुमची भाषणे महाराष्ट्र ऐकतोय, असेही शेलार म्हणाले. यामुळेच काही काळात सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन आशिष शेलार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांना आडनाव बदलण्याचा सल्ला दिला. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उपनेतेपद देण्यात आले होते.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्या प्रभावी वकृत्वाने सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. त्यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाकडूनही वेळोवेळी प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला काल एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आणि आदरांजलीही वाहिली. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा पार पडला. त्यानंतर ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शुद्धीकरण करण्यात आले. यावरूनही शेलार यांनी टोला लगावला.