भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तर गुजराती बांधवांना मोलाचा सल्ला दिला आहे. आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या व्हिडिओवर आपले मत व्यक्त करत जडेजाला खडेबोल सुनावले असून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
मी तो व्हिडिओ बघितला आहे, ज्या पद्धतीने तो व्हिडिओ घेतला गेला, त्याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींच्या करिष्म्याने काहीच होत नाही, काही जरी झालं तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची गरज लागते. निवडणुका गुजरातच्या असो, वा महाराष्ट्राच्या असो, तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरे या नावाचीच लागते, असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.
हे सिद्ध झाले की मोदी यांच्या नावाने मतं मिळत नाहीत, याची खात्री झाल्यावरच जडेजासारख्या लोकांना बाळासाहेब यांचे नाव घ्यावे लागते, हा शिवसेनेचा विजय आहे आणि ही भाजप आणि नरेंद्र मोदी यांची गुजरातमध्ये हार आहे, अशी टीका अंधारे यांनी केली .