विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जुने उकरून काढायची सवयच सरकारला लागलेली आहे, परंतु यांनी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का जात आहेत याचं उत्तर आधी दिलं पाहिजे असं दानवे यांनी म्हटलं आहे.आमच्या कितीही चौकशा केल्या तरी काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारने चांगलं काम केलेलं आहे. मात्र तरीही राज्याचे उद्योगमंत्री चौकशी करत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असं दानवे यांनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाला टोला दरम्यान त्यांनी यावेळी शिवरायांच्या मुद्द्यावरून भाजपाला देखील टोला लगावला आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान राज्यपालांनी केला. त्यानंतर काल परवा मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली. याचा अर्थ शिवरायांचा अवमान तुम्ही सहन करताय.
यावर उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे बोलत आहेत, पण त्यांच्या बोलण्याची दखलही सरकार घेत नाही. यामुळे महापुरुषांच्या बदनामीला राज्य सरकार आणि केंद्र सरकार पाठिंबा देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच अनेक शेतकऱ्यांना मदतच मिळाली नाही पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सगळ्या विभागातून राज्य सरकारकडे प्रस्ताव पोहोचलेले आहेत, परंतु अजूनही सरकारने हे प्रस्ताव पूर्णपणे स्वीकारलेले नाही. अतिवृष्टीची मदत सुद्धा काहींना मिळाली तर अनेक जण अजूनही मदतीपासून वंचित आहेत.