मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांना जेरीस आणलं. सोमय्यांच्या तक्रारींमुळेच शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी हे ईडीच्या रडारवर आले.यशवंत जाधव आणि प्रताप सरनाईक हे त्यापैकीच. मात्र आता राज्यात अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर सत्तापालट झाली.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट-भाजप सत्तेत आले त्यामुळे आता शिंदे गटासोबत असलेल्य नेत्यांबाबत सोमय्यांची भूमिका काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. याबाबतच माध्यमांनी सोमय्यांना विचारलं.
सोमय्या म्हणाले की, “यशवंत जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्यावर आधीच कारवाई झाली आहे. दोघांचीही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसेच हा विषय न्यायालयातही आहे. एकाची बेनामी इमारत जप्त करण्यात आली आहे. तर दुसऱ्याची 25 कोटींची जमीन जप्त झाली आहे. आता हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. पुढचा निर्णय न्यायालय घेईल”, असं सोमय्या यांनी सांगितलं.