सोलापूर : पुलवामा मधील बंडूज भागात झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र या चकमकीत बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र सुनील काळे शहीद झाले. ही बातमी गावात पसरताच गावावर शोककळा पसरली. आणि गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले.

सुनील काळे यांचे पार्थिव पहाटे त्यांच्या घरच्यांना देण्यात आले. गावातून अंतयात्रा काढण्यात आली असताना लोकांनी आपल्या सुपुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी आलोट गर्दी केली. ओले डोळे आणि जड हृदयाने सकाळी दहाच्या सुमारास आपल्या सुपुत्राला गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांच्या अश्रूचा बांध फुटला.

दरम्यान, सुरक्षा दलाने बंडूजचा परिसर घेरला असून तिथे शोध मोहीम सुरु आहे. काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत आतापर्यंत दोन अतिरेकी ठार झाले आहेत. यापूर्वीच्या वृत्तानुसार पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बंडजू येथे शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलांनी संशयास्पद जागेभोवती जेरबंद केल्यामुळे दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.