Latest Marathi News

BREAKING NEWS

“शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला – सामना

0

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला ही पोटनिवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

यावर उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखात म्हटले की, अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे. मशालीच्या अग्निप्रकाशात भविष्यातील शिवसेनेचे तमाम विजयमार्ग आम्हाला स्पष्ट दिसत आहेत,असा घणाघात ठाकरेंनी अग्रलेखात केला आहे.

शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील! पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल! असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.