मुंबई | शिवसेना-भाजपची युती तोडणारे खरे मास्टरमाईंड एकनाथ शिंदे हेच आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केला. ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. भाजपसोबतची 25 वर्षांची युती तोडायला लावणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. फडणवीस यांच्या सरकारमध्ये आमचा छळ होतोय असे जाहीरपणे सांगत त्यांनीच पहिल्यांदा राजीनामा दिला होता, असे राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा महाविकास आघाडी सरकारने प्लान केला होता, या आरोपात काहीही तथ्य नाही. महाराष्ट्राची ही राजकीय परंपरा नाही. ही परंपरा गेल्या सात वर्षात सुरू झाली, आम्ही त्याचे बळी ठरलो. उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी अशी काहीही भूमिका घेतली नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांनी जे काही केलं त्याला मी बंड मानत नाही. जे लोक सोडून गेले त्यांना जायचं होतं. आम्हाला कल्पना होती. ज्यांना पळून जाऊन लग्न करायचं आहे त्याला थांबवून काय फायदा? त्यामुळे आम्ही कुणाला थांबवलं नाही. असे संजय राऊत म्हणाले. मला अटक करण्यात आली कारण सत्तांतर करताना माझी अडचण झाली होती. महाराष्ट्रातलं चांगलं सुरू असलेलं सरकार फोडून भाजपाला त्यांचं सरकार आणायचं होतं असं सुद्धा त्यांनी यावेळी भाजपावर आरोप लगावला होता.