शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिडवणूक अशा विविध मुद्द्यवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.महाविकास आघाडीकडून भाजप-शिंदे गटाला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. यातच पुढच्या वर्षी महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही सरप्राइज देणार आहोत, असा सनसनाटी टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला.
लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही कामाला लागलो आहोत. अलीकडे अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. २०२४ मध्ये आजच्याप्रमाणे निराशाजनक चित्र नसेल. लोक आता हुशार झालेत. आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षबदल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल आणि फडणवीसांसाठी आमच्याकडून सरप्राइज असेल, असे जयंत पाटील म्हणाले.
शिवसेनेचे एक वैशिष्ट्य आहे. जे लोक त्यांना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाहीत. सध्या महाराष्ट्रात शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे. त्याचा फायदा नक्कीच त्यांना होईल. शिवसेनेच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणू असे मी कधीही म्हणालेलो नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.