कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागले आहे.
कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, आता कसब्यात किंगमेकर कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, अश्यातच कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. “हू इज धंगेकर? कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी है” अशा मजकुराचे बॅनर्स सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. ‘हू इज धंगेकर?’ असा सवाल भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीचा प्रचारादरम्यान भरसभेत विचारला होता.
त्यालाच उत्तर देण्यासाठी कार्यर्त्यांकडून शहरात पोस्टरबाजी करण्यात आली असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आता कसबा आणि चिंचवडची मतमोजणी सुरु झाली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार असून, सर्व पुणेकरांचा लक्ष या निकालाकडे लागलं आहे तर या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.