Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवभक्त राज्यपाल कोश्यारींचे नियोजित सर्व कार्यक्रम उधळणार!

0

शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवा, अशी मागणी समाजातील सर्वच स्तरांतून होत आहे. त्यानंतरही राज्य व केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून त्यांची पाठराखण सुरू आहे. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजणार नसतील तर उठाव होणारच, असा निर्वाणीचा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. दरम्यान, संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने आक्रमक भूमिका घेत राज्यपालांचे सर्व कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.

शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोश्यारी यांच्याविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राज्यपाल हटावची मागणी महाराष्ट्रभरातून होत आहे. भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार उदयनराजे भोसले. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहून कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवून महाराष्ट्राबाहेर काढा अशी मागणी केली आहे.

मात्र, यासंदर्भात कोणतीच कारवाई होताना दिसत नसल्याने संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वातील स्वराज्य संघटनेने महाराष्ट्रात होणारे कोश्यारी यांचे कार्यक्रम उधळून लावणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. राज्यपालांविरोधात महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करून कोश्यारींना सळो की पळो करून सोडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी दिला आहे.

राज्यपालांना कितीही राजशिष्टाचार असला, तसेच ते कितीही प्रथम नागरिक असले तरी, या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्यापेक्षा त्या उपर कुणीही नाही, असे जाधव यांनी ठणकावले.
महाराष्ट्रातील घटनाबाह्य शिंदे सरकारच्या काळात राज्यात हुकूमशाही सुरू आहे. भाजप आणि राज्यपालांकडून जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषांचा अवमान केला जात आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे, अशी भारतीय जय हिंद पार्टीची मागणी आहे. राज्यपालांविरोधात शिवसेने घेतलेल्या भूमिकेला आणि पुकारण्यात येणाऱ्या आंदोलनाला भारतीय जय हिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशगौरव भोसले यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.