मुंबई | राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात सत्तासंघर्ष सुरूच आहे. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा दिला. ठाकरे गटाकडून शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर केलेल्या दाव्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने मागील आठवड्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाची बाजू ऐकून घेतली होती. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाकडून निकाल आल्यानंतरच निकाल देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्याची माहिती समोर येत आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी निकाल देऊ नये अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगानं निकाल देऊ नये असा युक्तीवाद उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला होता. सुप्रीम कोर्टाने वेगळा निकाल दिल्यानंतर काय असा प्रश्न ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोरील सुनावणीसमोर उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच निकाल देणार असल्याचे ठरविले आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 14 फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणी होणार आहे.
सध्या राज्यात पोटनिवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाला निकाल देणं शक्य होणार का यासंदर्भात शिंदे गट आणि ठाकरे गटातील युक्तीवादादरम्यान चर्चा झाली. याच सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील एकत्रित सुनावणीनंतरच निवडणूक आयोग निकाल देणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने युक्तीवादादरम्यान केलेली मागणी निवडणूक आयोग मान्य करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.