राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यामुळे राजकीय वर्तुळातून निषेध होत आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही यावरून सत्तारांवर टीका केली. “शिवसेना फोडून भाजपसोबत गेलेल्या शिंदे गटाला भाजपचा वाण नाही, पण गुण लागला.” असे ते म्हणाले. सत्तारांनी केलेले वक्तव्य हे केवळ निषेध करण्यापुरते मर्यादित नाही. एका बाजूला एकनाथ शिंदेंनी त्यांना माफी मागायला सांगितले. तर त्याच वेळी अब्दुल सत्तार हे सिल्लोडमध्ये स्वत:वर स्तुतिसुमने उधळत असल्यामुळे त्यांना खरंच माफी मागायला सांगितली की हा फक्त देखावा होता, हे स्पष्ट होण्याची गरज आहे.
शिंदे गटातील लोक ज्या प्रकारे भाषा वापरत आहेत. त्यापूर्वी भाजपची भाषाही विसरून चालणार नाही. भाजपचे नेते स्वत: शांत राहतात आणि त्यांच्या जोडीला जाऊन बसणाऱ्यांना बोलते करतात. त्यामुळे शिंदे गटातील लोकांच्या बोलण्यामागे भाजपच्या नेत्याचे डोके आहे का? हे तपासण्याची आवश्यकता आहे.” असेही भास्कर जाधव म्हणाले.
“नवनीत राणा किंवा रवी राणा यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सर्वांना माहिती आहे. त्यांना भाजपने कधीही थांबवले नाही. भाजपा हा सुसंस्कृत आणि ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ अशी बिरुदावली मिरवणारा पक्ष आहे. मात्र, सत्ता गेल्यानंतर त्यांनी सर्व ताळतंत्र सोडले आणि आता शिवसेना फोडून त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचा गट गेला आहे. त्यांना भाजपचा वाण नाही, पण गुण लागला.” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.