मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला आज जबर धक्का दिला जाणार आहे. आदित्य ठाकरेयांच्या युवासेनेचे असंख्य पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित बाळसाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे.
युवा सेनेच्या माजी सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह युवा सेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार आहे. पुण्यातील अनेक युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवासेनेच्या पदांचा राजीनामा दिला होता. युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात थांबविण्यासाठी सचिव वरूण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, वारंवार अन्यायाची वागणूक आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकंच काय तर पत्रकार परिषद घेऊन युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती.
युवासेनेच्या सहसचिव असलेल्या शर्मिला येवले यांच्यासह राज्यातील २० ते २५ पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान युवासेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेशासाठी बोलावण्यात आले असून आज संध्याकाळी हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे.