मुंबई | ‘शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात जे काही लोक शिवसेना सोडून गेले. ते आता बचावासाठी शिवसेना आम्ही सोडली नाही हे बोलत आहेत. मात्र त्यांचे हे नाटक फार काळ टिकणारे नाही. शिंदे गटाकूडन ठाकरे गटावर काही तकलादू आरोप करण्यात आले आहेत. ते पूर्णपणे आमच्या वकीलांनी खोडून काढले आहेत, आणि आपली भक्कम बाजू निवडणूक आयोगाकडे मांडली आहे’. असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला त्यांच्याजवळ असलेले पदाधिकारी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. मात्र ठाकरे गटाकडून ठाण्याचे विजय चौगुले, रायगडचे राजाभाई केणी, नंदुरबारचे श्रीराम रघुवंशी ,नंदुरबारचे किरनसिंह वसावे, चंद्रपूरचे नितीन माटे, धाराशिवचे दत्तात्रय साळुंखे, धाराशिवचे सुरज साळुंखे यांच्या कागदपत्रांवर निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सुनावणीवर आधी आक्षेप घेण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच ठाकरे गटाकडून कागदपत्र कोर्टात सादर केली होती. त्यावर शिंदे गटाने आक्षेप घेतला होता. मात्र तो आक्षेप आमच्या वकिलाने खोडून काढला. पण शिंदे गटाने ओढून ताणून कार्यकर्ते जमा केले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे खोटे आता उघडकीस आले असल्याचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत दोन्ही गटाकडून पुन्हा एकदा आपली बाजू निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली. शिवसेनेत फूट पडलेली नाही. या प्रकरणात शिंदे गटाने केलेल्या याचिकेत अनेक त्रुटी आहेत असा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर केला.