उद्धव ठाकरे यांना धोका देऊन एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर हातमिळवणी करून सरकार स्थापन केले तसेच मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले एकीकडे शिंद-फडणवीस सरकार गुण्यागोविंदाने सरकार चालवत असताना दुसरीकडे मात्र मतदार संघात शिंदे गट आणि भाजपात संघर्ष होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिंदे गटातील नेत्याच्या बालेकिल्ल्यातच आता भाजपने आंदोलन पुकारल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
शिंदे गटाचे नेते व सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते वादग्रस्त विधानं तर कधी गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहे. आता सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेत भाजप विरुद्ध शिंदे गट संघर्ष पेटला आहे. मागील आठवड्यातच ढोल बजाव आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात भाजप रस्त्यावर उतरलं असून आज भाजपने सिल्लोड बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सत्तार यांची डोकेदुखी वाढली आहे.
सिल्लोड नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या करवाढीविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रस्तावाविरोधात उपविभागीय अधिकारी यांना २६ जानेवारीला निवेदन देण्यात आलं होतं. प्रस्तावित करवाढ चुकीची असून बेकायदेशीर असल्याचाही आरोप करत ती रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी भाजपकडून मागील आठवड्यातच ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
भाजपकडून यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले. प्रस्तावित करवाढ ही चुकीच्या पद्धतीने लावलेली असून ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे असा आरोप केला आहे. तसेच करवाढीसाठी शहराचे चार झोन करण्यात आले असून, सर्वाधिक कर झोन क्रमांक एक मधील मालमत्तांना लावण्यात आल्याने सामान्य जनतेला वेठीस धरून मालमत्ता करवाढ करण्याचे षडयंत्र आहे असंही म्हटलं आहे.