गेले काही दिवस मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढलेली असतानाच राज यांच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला शुक्रवारी दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिवाळीचा सण आहे. दोन वर्षानंतर हा सण आपण साजरा करतोय. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं आणि दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात, असं अजित पवारांनी म्हटलं. तसेच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे एकत्र आले असतील, तर त्याच्यात चुकीचं काय आहे? असा सवालही अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, राज ठाकरेंच्या निमंत्रणाला मान देऊन मी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दीपोत्सव कार्यक्रमाला आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. दीपोत्सव कार्यक्रमाचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दिवाळी आपली संस्कृती आहे. दरवर्षी प्रमाणे मनसेने दीपोत्सव कार्यक्रम केला आणि त्या निमित्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.