मुंबई: लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करू शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही. इंदिरा गांधींसारख्या जनमानसात प्रचंड पाठिंबा असणाऱया व्यक्तीलासुद्धा पराभव पाहावा लागला होता. अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालासुद्धा पराभव पाहायला मिळाला. या देशातला सामान्य माणूस लोकशाहीच्या अधिकाराच्या संदर्भात आम्हा राजकारणातल्या लोकांपेक्षा अधिक शहाणा आहे आणि आमचं पाऊल चाकोरीच्या बाहेर टाकतोय असं दिसलं की तो आम्हालाही धडा शिकवतो. त्यामुळे कोणतीही भूमिका घेऊन बसलो की आम्हीच! आम्हीच येणारचं तर लोकांना ते आवडत नाही, असा खोचक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी फडणवीस यांना टोमणा लगावला आहे.
विधानसभेला शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. विधानसभेला त्यांच्या आमदारांची 105 ही जी फिगर झाली त्यात शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. त्यातून तुम्ही शिवसेना मायनस केली असती, त्याच्यात सामील नसती तर 105 चा आकडा तुम्हाला कुठेतरी 40-50 च्या आसपास यावेळी दिसला असता, अशी टीकाही पवार यांनी केली.
शरद पवार म्हणाले, “शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते. ‘मी पुन्हा येईन’ म्हणण्यामध्ये दर्प होता. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरु नये. भाजपचे ‘आता आम्हीच’ हे लोकांना आवडले नाही.