राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर कुणाकडे किती आमदार, याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम असून शरद पवार आणि अजित पवार गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दोन्ही गटांकडून बोलावलेल्या बैठकीत कुणाकडे किती आमदार याचे चित्र थोड्यावेळात स्पष्ट होऊन कोण ‘पॉवर’बाज हेही स्पष्ट होणार आहे.
यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे फोटो बॅनरवर लावण्यावरून अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना चांगलेच खडसावल्याचे सांगितले जात आहे. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो लावावेत, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. तसेच ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी पलटवार केला. यावर जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरींध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांचा फोटो वापरला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावर अमोल मिटकरी यांनी पलटवार केला.