महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील २ गटातील वाद वाढतच चालला आहे. त्यामुळे आता हा वाद मिटवण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहे. याबाबत पवार येत्या ८-१० दिवसांत खासदार बृजभूषण सिंह यांची भेट घेणार असल्याची माहिती काका पवार यांनी दिली आहे. कुस्तीगीर परिषदेतील २ गटांमुळे कुस्तीपटूमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील वाद न्यायालयात पोहचला आहे. या दोन्ही गटाकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन आम्हीच करणार असं जाहीर करण्यात आले आहे. बाळासाहेब लांडगे यांच्या गटाकडून डिसेंबर महिन्यात अहमदनगरमध्ये या स्पर्धा भरवू असं सांगण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटाकडून ११ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवू असं जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुस्तीपटूमध्ये मोठा संभ्रम आहे. या वादामुळे कुस्तीपटूचे नुकसान होऊ नये यासाठी पवार-बृजभूषण सिंह यांनी बैठक घेण्याचं ठरवलं आहे.
येत्या ८-१० दिवसांत ही बैठक होईल अशी माहिती अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांनी दिली आहे. शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. बृजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेतील हा वाद मिटणार का? यासाठी पवार-बृजभूषण सिंह यांच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे.