दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये असे नियम आहेत ज्यामुळे आजही वाद निर्माण होतात. केरळ येथील एर्नाकुलम याठिकाणी एक हिंदू मंदिर आहे. मंदिरात दक्षिण सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल शंकराच्या दर्शनासाठी पोहोचली होती. पण अभिनेत्रीला मंदिरात दर्शनासाठी जाण्याची परवानगी नाकारली. मंदिर प्रशासनाने अमाला पॉल हिला शंकराच्या मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर अभिनेत्रीने निराशा व्यक्त केली आहे. या घटनेनं सध्या सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
सोमवारी जेव्हा अभिनेत्री अमाला पॉल शिव मंदिरात दर्शनासाठी गेली. तेव्हा अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं, की लांब राहून दर्शन घ्या. मंदिर प्रशासनाने हिंदू धर्माचा दाखला देत सांगितले की, मंदिरात फक्त हिंदूच प्रवेश करू शकतात. त्यानंतर अभिनेत्रीने लांब उभं राहून दर्शन घेतलं. व्हिजिटर रजिस्टरमध्ये अमाला पॉल निराशा व्यक्त केली.
अमाला पॉल हिने लिहिलं मंदिरात जावून दर्शन घेता आलं नाही, पण असं वाटलं की माझं दर्शन झालं आहे. पुढे अभिनेत्रीने लिहिलं, ‘२०२३ मध्ये देखील असा भेदभाव होत आहे. मी मंदिरात जावून दर्शन घेवू शकली नाही. ती वेळ लवकरच येईल आणि सर्वांना धर्माच्या आधारावर नव्हे तर माणसांसारखं वागवलं जाईल.’ अशी आशा अभिनेत्रीने याठिकाणी व्यक्त केली. मात्र यावर मंदिर प्रशासनाने सर्व आरोप फेटाळुन लावले.